Saturday, October 10, 2009

आता माझ्या साऱ्या गोष्टी

आता माझ्या साऱ्या गोष्टी
तुझ्यापाशी येऊन थांबतात
वाहणारे वारेही हल्ली
तुझीच कहाणी सांगतात

तुझ्या डोळ्यात खोलवर
झोप माझी विरलेली
तुझी माझी स्वप्नभेट
रोज रात्री ठरलेली
स्वप्नातल्या त्या गप्पांसोबत
रात्रीही हल्ली लांबतात

खिडकीतून झिरपणारी किरणे
अंगावर येताना वाटते असावा तुझाच हात
डोळे उघडल्यावर पण कळते सारे खरे
मिठीतल्या उशीनेही केलेला असतो घात
किरणे काय, उशी काय
सारे तुझेच अस्तित्व सांगतात

तु सांडलेल्या मोगऱ्याच्या गंधाचा
मी करत राहतो पाठलाग
कळ्याही वाटेवरच्या अवचित येतात खुलून
तुझा श्वास दरवळतो बनून पराग
चालता चालता शेवटी तुझ्या मिठीत येऊन पोहोचतो
आणि पुढचे सारे रस्ते संपलेले असतात

Wednesday, October 7, 2009

हसण्याचेही आताशा मी

हसण्याचेही आताशा मी कर्ज काढलेले
जगण्यासाठी श्वास थोडे उसने घेतलेले

शत्रूंच्या शोधात काल निघालो मी जेव्हा
मित्र माझे नेमके वाटेत भेटलेले

मनात धुंडाळता अलगद आठवणींचे कप्पे
तिच्या नावाखाली काही अश्रू सांडलेले

आयुष्यभर शोधिली मी माझ्या जगण्याची कारणे
उत्तर शेवटी मिळाले मरणाशी सांधलेले

नकोच होते एवढे तरी मागून घेतले मी
हवे होते मात्र जे न घेताच राहीले

Tuesday, September 8, 2009

कविता का? कुणावर? कशासाठी?

कविता का? कुणावर? कशासाठी?
असले क्षुल्लक प्रश्न विचारु नये कधी
मनातल्या भावना मोकळेपणाने मांडत्या आल्या असत्या
तर कुणी कविता केली असती का कधी?

Monday, August 31, 2009

आधीच कळलं होतं.....

भावनाशुन्य जगावं लागेल हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून आधीच पाऊल वळलं होतं

तुझ्या जाण्याने फ़ारसं दु:ख झालं नाही कदाचित
तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं

मनातल्या आठवणींचा वृक्ष हलला होता जरासा
पिवळं होण्याआधीच तुझं पान गळलं होतं

यार कसले जपले तेही उलटलेच शेवटी
मरण्याआधीच त्यांनी माझं सरण जाळलं होतं

कुठल्याही कंपूत मला सामील केले नाही
येण्याआधीच माझं त्यांनी नाव गाळलं होतं

Saturday, August 29, 2009

हल्ली माझ्या नकळत

पेनातून हल्ली
माझ्या नकळत
मनात दडवलेल्या गोष्टी
अलगद कागदावर उतरतात
मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो
माझ्याच मन, पेन व हातानी
माझ्याविरुध्द चालविलेले हे डाव
आणि टेबलावर वाढत जाणारे
कवितांचे बाड!

Tuesday, August 11, 2009

काल भर चौकात

काल भर चौकात एका म्हाताऱ्यामागे
एक पिसाळलेला कुत्रा लागला
म्हातारा पळू लागला जिवाच्या आकांताने
पाहत होता बाजार सगळा
एवढ्यात कुठून कोण जाणे
एक काळं टि-शर्ट घातलेल्या माणसाने
झाडली कुत्र्यावर एक गोळी
कुत्रा तिथेच गतप्राण झाला
फ़ोडून एक किंकाळी
भेदरलेल्या म्हाताऱ्याभोवती
एव्हाना घोळका सारा जमला
त्या इसमाच्या नावानेही
जयघोष सुरु झाला
कोणी म्हणालं
त्या हिंदू माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी हिंदू नाही!"
आणखी कोणी म्हणालं
त्या मुस्लिम माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी मुस्लिम नाही!"
आणखी कोणीतरी बोलला की
त्या ख्रिस्ती माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी ख्रिस्ती नाही!"
ह्यावर त्याला लोकांनी विचारलं
’तु कोण आहेस?’
तो म्हणाला मी काही देव-धर्म मानत नाही
मी एक नास्तिक आहे
हे ऐकताच कोणीतरी ओरडलं
त्या हिंसक नास्तिकाने
एका कुत्र्याचा बळी घेतला
ठेचा त्याला!"

काल भर चौकत एका नास्तिकामागे
एक पिसाळलेला समाज लागला!

झाली सांज एकाकी

झाली सांज एकाकी
कोणी वाजवेना पावा
सूर हरपल्या मनी
कृष्ण दाटून का यावा?

का रंग मावळतीचे
आज काळॊखी बुडाले
का पंख परतीचे
आज नाही ऊडाले
काजळता संध्याकाळ
वाहे उदासीन हवा

अवघडलेला चंद्र
चांदणीही बुजलेली
अवेळीच्या काळोखाने
रातराणी कोमेजलेली
झुळूक हळवी येताच
उर का भरावा?

पिसे होई मन
धावे दिशाहीन
वाट चाले आंधळी
क्षितिजात होता लीन
सैरभैर धरणीला
कंप का फ़ुटावा?

Wednesday, May 13, 2009

एकटे आपण घाबरलेले

एकटे आपण घाबरलेले
स्वत:त कुठेतरी गुंतलेले
स्वैर भटकणा~या मनासोबत
आपणही कुठेतरी भरकटलेले

नात्यांपासूनी दूर अन कोंडलेली दारे
सुर्यही अंधारलेला, घुस्मटलेले वारे
मन चंद्र, जळे एकटेच
न लुकलुकती तारे

न सरती आता राती
नुसत्याच वाती जळती
करुन किव जगण्याची
उरकतो आठवणींची माती

मग दिसतो एक वाडा
दूर गावात वसलेला
एक तटस्थ चेहरा
सुर्यास्त बघत बसलेला

काही आकृत्याच दिसती
नाचताना, बागडताना
मीही मग होतो
त्यांच्यातलाच एक तान्हा

मग आई कुठूनशी येते
अन दिवा लावूनी जाते
कुशीत तिच्या त्या रात्री
सारे घर झोपी जाते

आई मात्र एकटिच
हलकेच डोळे टिपते
आर्त स्वरात एकटिच
अंगाई गात राहते

मी हळूच होतो जागा
ह्या गावाकडच्या स्वप्नातून
अन वाट चालतो शहराची
माणसांच्या तुंबलेल्या गटारातून

जिथे भावनाच झाल्या पोरक्या
वेदनांना, स्पंदनांना
आणि कान झालेत बहिरे
गर्भी आक्रोशणा~या रुदनांना

अश्रु पुसण्यास कोणी नाही
डोळे खोल, सुस्तावलेले
सभोवताली नाही कोणीच
एकटे आपण असेच......घाबरलेले

Tuesday, January 27, 2009

गुलजार

गुलजार,
जेव्हा माझ्या भावना बनतात तुझे शब्द
तेव्हा तू आणि मी
चालत राहतो एक अनामिक वाट
वाटेवर तू शिंपीत जातोस
तुझ्या शब्दभांडारातले मोजकेच शब्द
मी ते वेचत असतो तुला दाद देत
तुझ्याही कल्पनांना मग धुमारे फ़ुटू लागतात
व जेव्हा तू ठेवतोस माझ्या वेदनांवर बोट
तेव्हा मात्र तू होतोस असह्य
पण तरीही का कोण जाणे, तुझा आवाज ऐकत रहावासा वाटतो
तु केलेल्या माझ्या असह्य वेदनेवरच्या सुसह्य कोटीला
साथ असते वाहणा~या अश्रुंची
आणि इथं घडतो एक संगम
तुझे शब्द व माझ्या अश्रुंचा
ज्यात मी अथांग बुडतो
काही वेदना विसरण्यासाठी
तर काही ताज्या करण्यासाठी